‘कलाकाराच्या नजरेतून पर्यावरणाचा वेध’

‘कलाकाराच्या नजरेतून पर्यावरणाचा वेध’ हा महाराष्ट्रातील कलाकारांना जोडून घेणारा ‘परिसर’ संस्थेचा एक उपक्रम आहे. ‘लाख को ५०’ (दर लाख लोकसंख्येमागे किमान ५० बसेसची उपलब्धता) या राज्यव्यापी मोहीमेचा भाग म्हणून सुरू केलेल्या या उपक्रमामध्ये मोहिमेच्या मागणीला धरून कलाकारांनी कलाकृती सादर कराव्यात ही कल्पना आहे. माणसाच्या मनाला भिडण्याची ताकद कलेमध्ये असते. म्हणूनच कलेच्या माध्यमातून मांडलेला सामाजिक संदेश अधिक खोलवर परिणाम करतो. ‘शहरांतील बिघडते पर्यावरण आणि वातावरण सुधारण्यासाठी सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्था सक्षम करायला हवी’ – ही या मोहिमेची मुख्य मागणी कलाकारांनी आपली चित्रे, छायाचित्रे वा व्हिडिओतून व्यक्त करण्याचे आवाहन परिसरने केले आहे.

तुमच्या कलेच्या माध्यमातून या विषयाकडे लोकांचे लक्ष वेधून त्यांना बदलासाठी प्रवृत्त करू शकता. शहरातील पर्यावरण सुधारण्यासाठी सार्वजनिक बस वाहतुकीत सुधार होणे किती जरूरीचे आहे, हे अधोरेखित करू शकता आणि बदल घडवण्याच्या प्रक्रियेला हातभार लावू शकता.

कलाकृती पाठवण्याचा अंतिम दिनांक: ०३ ऑगस्ट २०२१

विषय:

खालीलपैकी कोणत्याही एका वा एकापेक्षा अधिक विषयांवर तुम्ही चित्रे, छायाचित्रे, व्हिडिओ तयार करू शकता. कलाकृती संपूर्णपणे तुमची असली पाहिजे, ही मुख्य अट आहे. या विषयांना दर्शवणाऱ्या सर्जनशील अशा मूळ व स्वतंत्र कलाकृतींना परिसरतर्फे प्रसिद्धी देण्यात येईल.

१. माझ्या शहरातील बसेस, माझे पर्यावरण, माझी पृथ्वी

२. अधिक चांगल्या पर्यावरणाशी माझ्या शहरात बससंख्या जास्त पाहिजे, सेवा सुधारली पाहिजे

३. महाराष्ट्रातील शहरांमध्ये एक लाख लोकसंख्येमागे किमान ५० बसेस हे प्रमाण पाहिजे; ‘लाख को ५०’

४. कार, दुचाकी या वैयक्तिक, खाजगी स्वयंचलित वाहनांपेक्षा बस वाहतूक ही अधिक पर्यावरण-स्नेही आहे

५. सक्षम बस वाहतुकीमुळे माझ्या शहरातील हवेचे प्रदूषण आणि हवामान बदलाची तीव्रता कमी होते.
६. शहरातील वृक्षराजी म्हणजेच हरित आच्छादन टिकवण्यासाठी बससेवा महत्त्वाची आहे.

७. बस वाहतूक आणि जैवविविधता

८. खाजगी स्वयंचलित वाहनांसाठी लागणाऱ्या पायाभूत सेवासुविधांच्या तुलनेत बस वाहतुकीसाठी लागणाऱ्या सुविधा शहरांना कमी हानीकारक असतात.

किंवा

खालील आकृती पहा, ती पाहिल्यावर या आकृतीतील घटकांना धरून तुमच्या मनात जे येते त्यावर आधारित कलाकृती तयार करा.

सहभागी होण्यासाठी

इच्छुक स्पर्धकांनी सहभागी होण्यासाठी ‘कलाकाराच्या नजरेतून पर्यावरण’ हा फॉर्म भरावा. हा फॉर्म भरलेल्यांच्या प्रवेशिकांचाच विचार केला जाईल. एका कलाकाराची केवळ एक कलाकृती स्वीकारली जाईल. एकापेक्षा अधिक फाईल पाठवू नये ही विनंती.

कोणही अन्य व्यक्तीचे काम आपल्या नावाने सादर करू नये, अशा कलाकृती या स्पर्धेसाठी अपात्र ठरतील.

विभाग

तीन विभाग: वर नमूद केलेल्या विषयांवर खालील विभागांकरिता कलाकृती सादर करता येतील.

चित्रकला

1. चित्रे, रेखाटने, पेंटींग किंवा डूडल
2. यांचा फोटो घेऊन वरील फॉर्मसह पाठवावा.
3. फोटो सुस्पष्ट आणि हाय रिझोल्यूशनचा असावा. (पोर्ट्रेट करिता किमान १६०० पिक्सेल रूंदी आणि लँडस्केप करिता किमान १६०० पिक्सेल लांबी असावी)

छायाचित्रे

1. पोर्ट्रेट किंवा लँडस्केप स्वरूपात म्हणजेच उभी वा आडवी फ्रेम असलेली छायाचित्रे
2. फोटो वरील फॉर्मसह पाठवावा
3. फोटो सुस्पष्ट आणि हाय रिझोल्यूशनचा असावा. (पोर्ट्रेट करिता किमान १६०० पिक्सेल रूंदी आणि लँडस्केप करिता किमान १६०० पिक्सेल लांबी असावी)

व्हिडिओ

1. वर नमूद केलेल्या विषयांवरील लघुपट
2. जर तुम्हाला लेखनातून व्यक्त व्हायला अधिक आवडत असेल तर तुमची कविता, गीत, जिंगल, घोषणा/संदेश व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवू शकता. मराठी, हिंदी, इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेचा वापर करता येईल.
3. व्हिडिओ इन्स्टाग्राम रीलस् वरून आणि परिसरच्या फेसबुक व ट्विटर पेजवरून शेअर करण्यात येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त १ मिनिटांपर्यंत लांबीचा असावा.
व्हिडिओ जर १ मिनिटांपेक्षा मोठा असेल तर ऑनलाईन अपलोड करावा (युट्यूब, व्हिमिओ, फेसबुक वॉच) व त्याची लिंक सादर करावी. आम्ही परिसरच्या अकाऊंटवरून ती प्रसारित करू.
4. व्हिडिओ क्वालिटी: किमान 720p (हाफ एचडी), 1080 (फुल एचडी) असल्यास अधिक चांगले.

श्रेयनिर्देश आणि विजेते

शहरातील पर्यावरण सुधारण्यासाठी सार्वजनिक बस वाहतुकीचे महत्त्व कलात्मकरित्या अधोरेखित करणाऱ्या प्रत्येक कलाकृतीला परिसरतर्फे प्रसिद्धी देण्यात येईल. या कलाकृती परिसरचे सोशल मिडिया फ्लॅटफॉर्म व बेवसाईट यावर प्रसिद्ध होतील.

सर्व प्राप्त कलाकृतींमधून प्रत्येक विभागातील सर्वाेच्च तीन कलाकृती निवडण्यात येतील. राज्याचे पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आयोजित विशेष वेबिनारमध्ये त्या जाहीर होतील.

प्रत्येक विभागातील सर्वोत्तम कलाकृतीला रू. ५००० रोख पारितोषिक दिले जाईल.

इंग्रजीमध्ये उपक्रम मार्गदर्शक तत्त्वे येथे वाचा